भंडारी समाज हा भारताच्या पश्चिम भागात राहणारा समाज आहे.
विल्यम मोल्सवर्थ यांनी त्यांच्या कोशात भंडारी शब्दाचा अर्थ तिजोरीवाला किंवा द्रव्यकोश साभाळणारा असा दिला आहे. पूर्वीच्या काळी, राज्याच्या भांडारावर देखरेख करणारे ते भंडारी असे मानले जाते. राजाच्या विरूद्ध बंड करणाऱ्यांचा पाडाव करून राजाची मर्जी राखणारे ते बंडहारी – भंडारी असाही एक समज आहे. ते ताडीमाडी काढण्याच्या व्यवसायाकडे अठराव्या शतकात वळल्याचे दिसते; तसेच, ते दारू गाळण्याचा व्यवसायही करत असत. भंडारी समाज मूळचा क्षत्रिय. तो राजनिष्ठ व लढवय्या होता. सखाराम हरी गोलतकर यांनी 1925 मध्ये ‘भंडारी ज्ञातीचा इतिहास’ हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यांची वस्ती कारवार होनावर्ते ते गुजराथच्या किनारपट्टीपर्यंत आहे. भंडारी जातीची उत्पत्ती पं. महादेवशास्त्री जोशी यांनी पुराण कथेने नोंदली आहे - तिलकासूर नावाचा दैत्य फार माजला होता. म्हणून भगवान शंकराने त्याला घाण्यात टाकले आणि नंदीला घाणा फिरवण्यासाठी सांगितले. नंदीचे कष्ट पाहून शंकराला घाम आला. त्याच्या कपाळावरील घर्मबिंदूतून एक पुरुष निर्माण झाला. तो भंडाऱ्यांचा मूळ पुरुष! तो शंकराची स्तुती करत होता म्हणून शंकराने त्याला भावगुण असे नाव ठेवले. शंकराने त्याच्या लिलेने तेथे एक नारळाचे झाड निर्माण केले आणि त्यावरचे फळ तोडून आणण्याची आज्ञा भावगुणाला केली. ते पाणी पिऊन शंकर तृप्त झाला आणि त्याने भावगुणाला अलकावतीच्या भांडारावर अधिकारी म्हणून नेमले. भंडारी समाजात कित्ते भंडारी, हेटकरी भंडारी, खळे भंडारी, गावड भंडारी, चौधरी भंडारी, देवकर भंडारी, मोरे भंडारी, शेषवंशीय ऊर्फ शिंदे भंडारी असे प्रमुख भेद आहेत. ते पोटभेद त्यांच्या गावांवरून, व्यवसायावरून व त्यांच्या मूळ उत्पत्ती कथेवरून पडले असावेत. उदाहरणार्थ, खांदेरीजवळच्या ‘खळ’ गावातील खळे भंडारी किंवा मौर्य राजाबरोबर महाराष्ट्रात आलेले ते मोरे भंडारी, कदंब किंवा कीर्ती राजाचे अनुयायी ते कित्ते भंडारी, हाती शस्त्र धरणारे ते हेटकरी भंडारी, गावड हे बंगाल (गौडदेश) मधून आले आहेत, म्हणून ते गावड भंडारी व शेषवंशीय भंडारी हे लोक शेषाचे वंशजसमजले जातात. सहासष्ट क्षत्रिय कुळे पैठणहून उत्तर कोकणात आली. त्यांतील नऊ कुळे शेषवंशीय भंडारी समाजाची आहेत. ही माहिती ‘महिकावतीची बखर’, ‘साष्टीची बखर’ व सखाराम हरी गोलतकर यांच्या ‘भंडारी ज्ञातीचा इतिहास’ या ग्रंथांतून मिळते.
शिरगणतीनुसार जवळ जवळ निम्मे भंडारी रत्नागिरी जिल्ह्यात होते. त्या खालोखाल मुंबई शहर, सावंतवाडी संस्थान, ठाणे जिल्हा, कॅनरा जिल्हा, कुलाबा जिल्हा, जंजिरा संस्थान, सुरत जिल्हा आणि मुंबई उपनगर असा भंडाऱ्यांच्या वास्तव्याचा प्रदेश आहे. मुंबईचा वाढलेला विस्तार आणि तेथे गेल्या साठ-सत्तर वर्षांत झालेली स्थलांतरे लक्षात घेतली तर मुंबईत सर्वांत जास्त भंडारी असावेत. भंडारी हे मूळच्या मुंबईच्या रहिवाशांपैकी होत, मात्र कोळ्यांचा जसा आवर्जून मुंबईचे मूळ रहिवासी म्हणून उल्लेख होतो तसा भंडाऱ्यांचा होत नाही. मुंबईत भंडाऱ्यांची संख्या 1931 च्या शिरगणतीनुसार कोळ्यांच्या सहापट होती. त्यांतील खूपसे दक्षिण कोकणातून स्थलांतरित झालेले होते. ‘जेथे माड तेथे भंडारी’ असे म्हटले जाते. मुंबई इंग्रजांच्या ताब्यात 1668 मध्ये आली. जेरॉल्ड ऑजिअर 1670 ते 1677 या काळात मुंबईचा गव्हर्नर होता. त्याने मुंबईच्या विकासाचा पाया घातला. त्याने सर्व धर्मांच्या लोकांना तेथे विनातक्रार राहता येईल असे धोरण आखले, व्यापारी-कारागिरांना सवलती दिल्या, इस्पितळे काढली, न्यायालये सुरू केली, संरक्षणासाठी ‘बॉम्बे मरीन’ नावाचे आरमार उभारले आणि बंदोबस्तासाठी भंडाऱ्यांच्या मदतीने शिपायांची फलटण उभारली. ती मुंबई पोलिस दलाची सुरुवात होय. मुंबई शहराची उभारणी सुरू झाली तेव्हापासून भंडारी मुंबईत पोलिस दलांत आहेत. भंडारी पोलिसांची फलटण कित्येक वर्षे ‘भंडारी मिलिशिया’ या नावाने ओळखली जाई.
भंडारी समाज दक्षिणेस गोव्यापासून उत्तरेत भडोच शहरापर्यंत वास्तव्य करून आहे. भंडारी समाज ज्या भागांत वास्तव्यास आहेत त्यांनी त्या भागांतील बोलीभाषा /प्रांतभाषा आत्मसात करून ते त्या भागाशी एकरूप झालेले दिसतात. उदाहरणार्थ, गुजराथमधील देवकर भंडारी गुजराथी बोलीभाषा बोलतात तर गोव्यातील भंडारी गोमंतकांतील बोलीभाषा बोलताना आढळतात. कोकणातील भंडारी कोकणी बोलतात.
भंडारी समाजातील पुरुष धोतर, सदरा व सफेद किंवा काळ्या रंगाची टोपी वापरत असत. विशेष समारंभासाठी जाणे असल्यास उपरणेही परिधान करत. आर्थिक संपन्न असलेल्या कुळांतील पुरुष धोतर, डगला, उपरणे व डोक्यावर पगडी घालत असत. स्त्रियांचा पेहराव साधाच असे. त्या काळात स्त्रिया विशिष्ट पद्धतीने लुगडे नेसत, त्याला आडवे लुगडे नेसणे असे म्हणत. ते शेतीच्या व दैनंदिन कष्टाच्या कामासाठी सुटसुटीत पडत असावे. घरंदाज स्त्रिया मात्र उभे नऊवारी लुगडे नेसत. नाकात नथ असे व कानांत मोत्याची कुडी किंवा कर्णफुले घालत. नव्या काळात सर्रास सर्व स्त्री व पुरुष आधुनिक पद्धतीचा पेहराव करतात. पुरुष शर्ट-पँट परिधान करतात तर स्त्रिया पाचवारी साड्या किंवा पंजाबी / गुजराथी ड्रेस घालू लागल्या आहेत.